पुणे: पुण्यातील मुंढवा (Pune Land Scam) येथे पार्थ पवार यांच्या (Sheetal Tejwani) कंपनीने खरेदी केलेल्या (Pune News) जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या शीतल तेजवानीला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल तिला ताब्यात घेतल्यानंतर आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. एका बाजूने तेजवानीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा, यासाठी ठोस मांडणी केली, तर सरकारी पक्षाकडून तिच्या जामीनाला कडाडून विरोध करण्यात आला.

युक्तिवाद सुरू असताना शीतल तेजवानीला अचानक चक्कर आल्याचा दावा करत तिने न्यायालयासमोर अस्वस्थता व्यक्त केली. यावर न्यायाधीशांनी तिला समोरच्या खुर्चीवर बसण्याची परवानगी दिली. दोन्ही बाजूंचे वकील आपापली बाजू मांडत असताना ती आरोपी पिंजऱ्यात उभी होती, त्याचवेळी तिने तब्येत बिघडल्याचे सांगितले.
दरम्यान, तेजवानीच्या वकिलांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. शीतल तेजवानीला मराठी भाषा समजत नाही, तरीही तिला मराठीतून नोटीस बजावण्यात आली, असा त्यांचा दावा होता. तसेच तिला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
सरकारी वकिलांनी हा दावा तात्काळ फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की, शीतल तेजवानीने महार वतनदारांचे कुल मुखत्यारपत्र घेतले होते आणि तो दस्तऐवज मराठीत होता. त्यामुळे तिला मराठी समजत नाही, हा दावा वस्तुस्थितीपासून दूर आहे. सरकारी पक्षाने तिच्या जामीनाला ठाम विरोध दर्शवला. याशिवाय, संबंधित जमिनीचे मुळ वतनदार असलेल्या महार वतनदारांच्या वंशजांच्यावतीनेही जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. शीतल तेजवानीने आमची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या सर्व घडामोडींमुळे शीतल तेजवानीच्या जामीनाबाबतचा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरणार असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







