पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क (Pune Land Scam) परिसरातील मुंढवा येथे (Parth Pawar) असलेल्या सुमारे 40 एकर जमिनीच्या विक्री प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. राज्याचे (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित या प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे.

अजितदादांनी मांडली भूमिका
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाशी संबंधित एक विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील काही तक्रारी थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत. याच मुद्द्यावरून अमेडिया प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच हे विधेयक आणले का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. (Breaking News)
नेमकं काय म्हणाले?
या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, जमीन व्यवहार होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य तपासणी करणे अपेक्षित होते. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर त्याच वेळी कारवाई व्हायला हवी होती. अधिकाऱ्यांकडून योग्य वेळी कारवाई झाली असती तर पुढील गोंधळ निर्माण झाला नसता, असे त्यांनी अनौपचारिक चर्चेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा: गजा मारणेला ‘VIP ट्रिटमेंट’ देणं पुणे पोलिसांना पडलं महागात! ढाब्यावर बिर्याणी खाऊ घातली अन्…
व्यवहार रद्द झाल्याची घोषणा
नेमके प्रकरण असे की, मुंढवा येथील सुमारे 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन अमेडिया कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचेही समोर आले होते. उद्योग संचालनालयाने हा व्यवहार अवघ्या 48 तासांत मंजूर केला होता आणि संपूर्ण प्रक्रिया 27 दिवसांत पूर्ण झाली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली होती.
शीतल तेजवानी यांची अटक
या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानी यांच्या नावावर होती. पोलिसांच्या तपासात त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अॅटर्नीचा गैरवापर करून शासकीय जमीन खासगी कंपनीच्या नावावर केल्याचे निष्पन्न झाले. कागदपत्रे सादर न केल्यामुळे संशय वाढला आणि अखेर तपासानंतर शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणात अद्याप पार्थ पवार यांच्यावर कारवाई न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.






