Pune Crime: पुणे: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय कधी हल्ला, धमकी तर कधी हत्या. गुन्हेगारी संपायचं नावचं घेत नाही अशातच, पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात खंडणीसाठी धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला सतत ईमेलद्वारे धमक्या देत डॉलर्समध्ये खंडणीची मागणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात धमकीपुरतेच न थांबता संबंधित व्यक्तीच्या घरात बॉम्बसारखी दिसणारी वस्तू पार्सलद्वारे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- आंबाडखिंड घाटातील वळणावर चारचाकी खड्ड्यात कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
या प्रकरणी रमेश गणपत अप्पा रुमाले (वय 54, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश रुमाले हे रावेत परिसरात वास्तव्यास असून ते नियमितपणे ईमेलचा वापर करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी रमेश रुमाले यांना पहिला धमकीचा ईमेल आला. या ईमेलमध्ये 10,000 अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागण्यात आली होती, जी भारतीय चलनात अंदाजे 9.07 लाख रुपयांइतकी आहे. सुरुवातीला हा ईमेल खोटा किंवा स्पॅम असावा, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतरही सातत्याने धमकीचे ईमेल येत राहिल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
दरम्यान, 8 डिसेंबर रोजी रुमाले यांच्या पत्त्यावर एक कुरियर पार्सल आले. या पार्सलमध्ये एक चिठ्ठी होती आणि त्यामध्ये पुन्हा डॉलर्समध्ये खंडणीची मागणी करण्यात आली होती. पार्सलमधील एक वस्तू बॉम्बसारखी दिसत असल्याने रमेश रुमाले घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पार्सलची तपासणी केली. सुदैवाने त्यामध्ये स्फोटक आढळले नाही. या प्रकरणी पुणे पोलीस पुढील तपासणी केली जात आहे.







