इंदापूर आदित्य बोराटे –

Indapur : विठ्ठलवाडी व बावडा (ता.इंदापूर) येथील बागल फाटा येथे पहाटेच्या सुमारास 3 ते 4 चोरटे घरात घुसून वृद्ध महिला व त्यांच्या नातेवाइकांवर मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व टीव्ही, असा सुमारे एक लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Indapur)
याबाबत सिंधु पाडुरंग भोंग (वय 65) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.15) डिसेंबर रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास घराचे दार उघडे असताना तोंडाला रुमाल बांधलेले 3 ते 4 चोरटे घरात शिरले. यावेळी फिर्यादीचे पती पाडुरंग भोंग यांना घराबाहेर एका चोरट्याने खाली बसवून ठेवले, तर उर्वरित चोरट्यांनी घरात प्रवेश करून सिंधु भोंग व त्यांची बहीण मुक्ताबाई ननवरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. दरोडेखोरांनी सिंधु भोंग यांच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे गंठण व डोरले, मुक्ताबाई ननवरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी, कानातील फुले व राजकड्या जबरदस्तीने काढून घेतल्या. तसेच, घरातील एलईडी टीव्ही व रोख 14 हजार रुपये असे एकूण 91 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पांढऱ्या रंगाच्या जीपसदृश चारचाकी वाहनातून पसार झाले.
दरम्यान, याच वेळेस बागल फाटा, बावडा येथेही अशाच वर्णनाच्या व्यक्तींनी आबासाहेब बागल यांच्या घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या त्यांच्या आई शांताबाई बागल यांच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून पळ काढला.







