पुणे: शहरातील सिंहगड रोडवरील धायरी परिसरात कोयता उगारून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुंडाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते (वय 22, रा. पारी कंपनी चौक, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime)

या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ओंकार सातपुते हा सराईत गुंड असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही बेकायदा शस्त्र बाळगणे व दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सातपुते याला 9 सप्टेंबर 2025 रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो पुन्हा धायरी परिसरात आल्याचे उघड झाले आहे.
शनिवारी (13 डिसेंबर) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास धायरीतील मारुती मंदिर परिसरात सातपुते याने नागरिकांना शिवीगाळ करत कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करत आहेत.







