Politics : पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“राजकारणातील गुन्हेगारीकरणाबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्याला आमचा ठाम विरोध आहे. पुण्याचे पालकमंत्री शहरातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या पक्षाच्या यादीत नेमकी कोणती माणसं आहेत, हे त्यांनी पुणेकरांना सांगावं,” असा थेट सवाल मोहोळ यांनी केला.

बाजीराव रस्त्यावरील भारत भवन येथे भाजपच्या निवडणूक माध्यम कक्षाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं की, आगामी महापालिकेत पुण्याचा महापौर भाजपचाच असेल.
शहरातील उमेदवारी वाटपावर सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजपने नेहमीच स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांनाच प्राधान्य दिलं आहे. वार्ड क्रमांक ३८ मधील प्रतिभा चोरघे यांच्या उमेदवारीचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की, त्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात सक्रिय आहेत.
“इतर पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिलं असेल, पण भाजप तसं करत नाही. पुणेकर हुशार आहेत, कोण काय आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि ते मतपेटीतून उत्तर देतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी मोहोळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या विकासकामांचा आढावाही घेतला. मेट्रोचा विस्तार, २४ तास पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय महाविद्यालय, चांदणी चौक प्रकल्प आणि विमानतळाचं नवीन टर्मिनल यामुळे पुण्याचं रूप बदललं आहे.
“हे विकासाचं राजकारण पुणेकरांना आवडलं आहे आणि पुन्हा एकदा महायुती व भाजपलाच कौल मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसंच भाजपनं ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श घातला आहे, असंही त्यांनी अभिमानानं सांगितलं.
महायुतीतील जागावाटपावर बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि आरपीआयची युती टिकावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपनं शिवसेनेला १६ जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यापेक्षा जास्त ‘एबी फॉर्म’ वाटप झाल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला.
हा तिढा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी आरपीआयला ८ जागा देण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, केशव उपाध्ये, दिलीप कांबळे यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.







