प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजविणे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे तसेच विविध प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्या अट्टल गुन्हेगारांविरोधात पुणे शहर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत दोन आरोपींना जिल्हा हद्दपार केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांचे सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील तडीपार इसम आरोपी लक्ष्मण ऊर्फ नाना अंकुष पवार (वय ४४ वर्षे, रा. विधाते वस्ती, दत्त मंदिराजवळ, औंध, पुणे) याच्या विरोधात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ क्रमांक ०४, पुणे शहर यांच्या कार्यालयाकडील जा.क्र. पोउपआ/परि-४/तडीपार/१२८७०/२०२५, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या तडीपार आदेश क्रमांक ६६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे त्याला संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच याच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील दुसरा तडीपार इसम आरोपी अजिंक्य आशोक बोबडे (वय १९ वर्षे, रा. विधाते वस्ती, सध्या रा. सद्गुरूकृपा, संत तुकारामनगर, नवी सांगवी, पुणे) याच्याविरोधातही गुन्हेगारी नोंदी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ क्रमांक ०४, पुणे शहर यांच्या कार्यालयाकडील जा.क्र. पोउपआ/परि-४/तडीपार/१२८७१/२०२५, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या तडीपार आदेश क्रमांक ६७/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे त्याला संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे हजर करून तडीपार आदेशाची अधिकृत बजावणी करण्यात आली. या आदेशानुसार संबंधित कालावधीत आरोपींना पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर, श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी ननावरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार विनय बडगे, गणेश पालांडे, संदीप ठोसर, श्रीकांत वाधवले, बाबा दांगडे, इरफान मोमीन, बाबू शिर्के, विशाल शिर्के, तुषार गिरंगे तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली जाधव यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.







