पिंपरी-चिंचवड: पिंपरी (Pimpri-Chinchwad) शहरातील साई चौक परिसरात मंगळवारी संध्याकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. सायंकाळचे 6 वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाच्या बेजबाबदार पार्किंगमुळे या वर्दळीच्या रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या त्रासाचा सामना करावा लागला. मुख्य रस्त्याच्या मधोमध ही कार उभी करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आणि वाहतूक पूर्णपणे थांबली. महत्त्वाचे म्हणजे, इतकी कोंडी होऊनही मोटारीचा मालक घटनास्थळी बराच वेळ उपस्थित नव्हता.

दंड आकारण्यात अडचण
वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस पथक तातडीने साई चौकात पोहोचले. बेकायदेशीरपणे उभी केलेली ही गाडी हटवण्यापूर्वी पोलिसांसमोर एक विचित्र अडचण उभी राहिली, या कारला नंबर प्लेट नव्हती. दरम्यान, इतक्या वेलची बेवारस कार उभी असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
नियम तोडणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे किंवा प्रत्यक्ष दंड आकारण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक असते. नंबर प्लेट नसताना मोटार नेमकी कोणाची आहे, हे तपासणे पोलिसांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत दंड कसा भरायचा, याचा मोठा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला.
काही प्रयत्नांनंतर, पोलिसांना या वाहनाची नंबर प्लेट डिकीमध्ये सापडली. प्लेट उपलब्ध झाल्यानंतर, वाहतूक विभागाने तातडीने संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या अशा चालकांवर सख्त कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे.







