पिंपरी चिंचवड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात भाजप आणि शिंदे शिवसेनेला तगडा राजकीय धक्का दिला आहे. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे एक असे चार माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. महायुतीमध्ये कोणतीही कटुता निर्माण न करता मैत्रीपूर्ण लढाई होईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर 24 तास पूर्ण होण्याआधीच अजित पवारांनी ही मोठी खेळी करून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी निर्माण केली आहे.

शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दावा केला आहे की, अर्ज भरण्याच्या आधी भाजप आणि शिंदे गटातील आणखी 7 ते 8 इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतील. यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये असलेली गोडी कायम राहणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, इच्छुकांना भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये सुरक्षित वाटत नव्हते, त्यांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्यामुळे महायुतीत कटुता येणार नाही, असे योगेश बहल यांनी म्हटले आहे. मात्र, महायुतीच्या घटक पक्षांनी एकमेकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, असे ठरले असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी हे फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सांगली मिरज आणि कुपवाड शहरातही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सांगलीतील माजी महापौर आणि 15 हून अधिक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. अजित पवार यांची भेट घेणारे हे सर्व माजी नगरसेवक काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत.







