पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरासह (PCMC News) पुणे जिल्ह्यात गेल्या काही काळापासून (Pune News) मद्यधुंद चालकांमुळे बस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रत्येक बसमध्ये ब्रेथ अॅनालायझर इग्निशन सिस्टीम बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या यंत्रणेमुळे चालकाने मद्यपान केले असल्यास बसचे इंजिनच सुरू होणार नाही.

मद्यपान आढळल्यास गाडीच सुरु होणार नाही
सध्या शहरातील काही जबाबदार बसमालकांनी स्वखर्चाने ही यंत्रणा आपल्या बसमध्ये बसवली आहे. मात्र सर्व बसमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आरटीओकडून जनजागृती केली जात आहे. ब्रेथ अॅनालायझर इग्निशन सिस्टीम ही आधुनिक सुरक्षा यंत्रणा असून वाहन सुरू करण्यापूर्वी चालकाच्या श्वासातील अल्कोहोलची पातळी तपासली जाते. मद्यपान आढळल्यास वाहन सुरू होत नाही.
नुकताच हिंजवडी परिसरात घडलेल्या भीषण अपघातामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मद्यधुंद चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने कंपनीची बस थेट पदपथावर चढली होती. या दुर्घटनेत तीन भावंडांचा मृत्यू झाला.
या घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड आरटीओने शहरातील सर्व बसमालक आणि वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बसमध्ये ब्रेथ अॅनालायझर इग्निशन सिस्टीम बसवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही व्यवस्था आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.







