Pandharpur : मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार संक्रांत उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जात आहे. या काळात राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला भाविक भोगीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने, यावेळी महिलांना दर्शनासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुरुष भाविकांसाठी काही खास नियमही लागू करण्यात आले आहेत. (Pandharpur)

भोगी दिनी वेळापत्रकात बदल
मकर संक्रांतीनिमित्त भोगी म्हणजेच मंगळवार, 13 जानेवारी रोजी श्री रुक्मिणी मातेची काकड आरती आणि नित्यपूजा पहाटे 3 ते 4.30 या वेळेत होणार आहे. ज्या माता-भगिनींना रुक्मिणी मातेला भोगी अर्पण करायची आहे, त्यांच्यासाठी पहाटे 4.30 ते 5.30 हा वेळ ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पहाटे 5.30 वाजल्यापासून रुक्मिणी मातेस पोषाख व अलंकार चढवण्यात येतील आणि सकाळी 6.30 वाजेपर्यंत दर्शन सुरू होईल, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
महिलांसाठी विशेष सोय
13 जानेवारी रोजी श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती व नित्यपूजा पहाटे 4.30 ते 5.45 या वेळेत होईल. त्यानंतर पहाटे 6 वाजल्यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू केले जाईल.
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी नेहमीप्रमाणे श्री रुक्मिणी मातेची काकड आरती आणि नित्यपूजा होईल. अलंकार परिधान झाल्यानंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच 15 जानेवारी रोजीही पूजा-अर्चा नेहमीच्या वेळेतच होणार आहे.
संक्रांतीच्या दिवशी जास्तीत जास्त माता-भगिनींना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सहज मिळावे, यासाठी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगांचे योग्य नियोजन, कमांडो तैनात करणे, टोकन दर्शन बुकिंग तात्पुरते बंद ठेवणे, स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालणे आणि पूजेची संख्या कमी करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून भाविकांना अधिक सुविधा मिळू शकतील.
हा संपूर्ण मकर संक्रांत उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, त्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली आहे.







