मुंबई: शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारी एक मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुंबईत केली आहे. चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राहुल विठ्ठल शिंदेला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील एका नामांकित शिक्षण संस्थेने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना मंजुरी मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. सर्व नियम पाळूनही ही फाईल मंजुरीसाठी वरिष्ठ लिपिक राहुल शिंदे याच्या टेबलावर अडकून पडली होती. हीच फाईल पुढे सरकवण्यासाठी आणि मान्यता मिळवून देण्यासाठी शिंदे याने संस्थेच्या प्रतिनिधीकडे थेट दीड लाख रुपयांची मागणी केली. नियमानुसार काम होणार असतानाही पैशांची मागणी झाल्याने तक्रारदाराने लाच देण्याऐवजी ‘एसीबी’ कडे भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे या प्रकरणाची पडताळणी केली. शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.







