सागर जगदाळे

भिगवण: रस्त्यांवरून सुसाट जाणाऱ्या गाड्यांच्या मॉडिफाइड सायलेन्सरमधून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि मोठ्याने फटाके फोडल्यासारख्या येणाऱ्या आवाजामुळे नागरिक व पादचारी त्रस्त झाले होते. या बेभान झालेल्या तरुणाईला वेळीच आवर घालण्यासाठी भिगवण पोलिसांनी हाती घेतलेली धडक मोहीम नक्कीच आश्वासक आणि कौतुकास्पद मानली जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेफामपणे गाड्या चालवणाऱ्यांना आणि सायलेन्सरमधून फटाक्यांचे आवाज काढणाऱ्यांना नक्कीच चाप बसणार आहे.
रस्ते अपघात कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता राखली जावी, या मुख्य उद्देशाने भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने ऑक्टोबर 2026 या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध वाहनचालकांवर कडक कारवाई करत पोलिसांनी तब्बल 60 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

विशेष म्हणजे, मोटारसायकलला बेकायदेशीररीत्या मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या 22 वाहनचालकांवर केसेस दाखल करून ते सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास करणे, विना नंबर प्लेट वाहने चालवणे, मद्यप्राशन करून वाहने चालवणे, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, तसेच शाळा आणि महाविद्यालयांसारख्या गर्दीच्या व शांतता क्षेत्रांमध्ये मोठ्या आवाजात टेप वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे की, दुचाकी चालवताना हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत आणि नियमबाह्य सायलेन्सर वापरू नयेत. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना सुरक्षेसाठी आवश्यक रिफ्लेक्टर लावावेत आणि वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये. यापुढेही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कामगिरी भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक वारगड, शंकर भोसले, समीर झांबरे, रणजित मुळीक व महिला पोलीस अंमलदार भोंग यांनी पार पाडली






