पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रशासकीय बंदीनंतरही ‘रॅपिडो’ ॲपद्वारे विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही ॲपवरून बाईक बुकिंग सहज शक्य होत आहे. उदाहरणार्थ, पिंपरी चौक ते पुणे स्टेशन या प्रवासासाठी ॲपवर 145 रुपये भाडे दाखवले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार राज्यात केवळ अटी व शर्तींनुसार इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी आहे. मात्र, रॅपिडो कंपनीकडे आवश्यक असणारा अधिकृत ॲग्रिगेटर परवाना उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर, 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत पुणे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कंपनीला ही अनधिकृत सेवा तत्काळ बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 16 ऑक्टोबर रोजी रॅपिडो कंपनीवर रीतसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.तसेच, आरटीओच्या विशेष पथकाने रस्त्यावर उतरून विनापरवाना धावणाऱ्या 5 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 56,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी पोलिसांनी गुगल आणि ॲपल कंपन्यांना पत्र पाठवले असून, आपल्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरून हे रॅपिडो ॲप हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने या बेकायदेशीर सेवेचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, खाजगी दुचाकी मालकांनी देखील आपल्या गाड्या अशा अनधिकृत प्लॅटफॉर्मवर नोंदवू नयेत, असा इशारा दिला आहे.







