पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकाकडून वाढदिवसानिमित्त “जनतेच्या मनातील आमदार रवींद्र धंगेकर ” अशी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरची मोठी चर्चा होत असून भाजपचे आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 2023 मध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढल्यानंतर आता त्यांनी शिंदेगटात पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशावर पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेगटात गेले, कसब्यात धंगेकर अजूनही ‘जनतेच्या मनातील आमदार’या जोरदार बॅनरबाजीने चर्चांना उधाण आलं आहे.
कसबा विधानसभेत भाजपचा आमदार आहे. आमदार हेमंत रासने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. धंगेकर शिवसेनेत येण्यापूर्वी धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत विधानसभेत झाली होती.आता धंगेकरांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात केलेल्या जोरदार बॅनरबाजीने महायुतीतील संघर्ष वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यातील महायुतीतील संघर्ष वेगळे वळण घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







