पुणे : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन एनडीएमध्ये (NDA) सामील व्हावे, अशी भाजपची इच्छा असल्याचे समजते. मात्र, यासाठी शरद पवारांनी स्वतंत्र राहण्याऐवजी पक्षाचे विलीनीकरण करावे, अशी अट भाजपने ठेवल्याची माहिती समोर आली आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता
विलीनीकरणाबाबतची पुढील चर्चा आता मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुश्रीफ म्हणाले की, भाजपच्या अशा कोणत्याही सूचनेबाबत आपल्याला कल्पना नाही. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली होती. तसेच पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने पक्षाचे तिन्ही मोठे नेते दिल्लीत असतील. त्यामुळे विलीनीकरणाबाबतची पुढील चर्चा आता मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होईल.पक्षांतर्गत घडामोडींवर बोलताना ते म्हणाले की, 22 जुलैपासून अजित पवार यांच्या स्मरणार्थ सेवा सप्ताह पाळला जाईल. त्यानंतर 29 जुलै रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे. या घरगुती कार्यक्रमानंतरच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होऊन, सर्व आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल.
सध्या पक्षात कोणतीही नाराजी नसून, सर्वजण सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तसेच राज्यातील अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहण्याबाबत मंत्री अमित शाह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, अधिवेशनानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







