Malvan News : मालवण: मालवण शहरातील चिवला बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यामुळे सर्व स्पर्धांमध्ये भीतीचे आणि धक्कादायक वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेत सहभागी झालेले पुण्यातील कोथरुड येथील रहिवासी पराग शरद टापरे वय 53 यांचा स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अचानक मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे स्पर्धा स्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिवला बीच येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत पराग टापरे यांनी 3 किलोमीटर गटातून सहभाग घेतला होता. त्यांनी समुद्रातून यशस्वीपणे पोहत स्पर्धा पूर्ण केली आणि किनाऱ्यावर आले. मात्र किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना चक्कर आली आणि ते थेट किनाऱ्यावरील वाळूत कोसळले.
ही बाब लक्षात येताच, स्पर्धेतील आयोजक आणि उपस्थित वैद्यकीय पथकाने तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ मालवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
घटनेनंतर पराग टापरे यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला होता. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






