Jayant Patil : वरळी डोम येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शोकसभेत त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आठवणींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती आणि सहकारी उपस्थित होते. शोकसभेत खासदार आणि सहकारी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या राजकीय ध्येयांची आठवण सांगितली.

जयंत पाटील म्हणाले की, “अजित दादांनी राजकारणात एकत्र काम करण्याचे स्वप्न बघितले. 1991 पासून आमची राजकीय कारकिर्द जवळपास एकत्र सुरू झाली आणि सभागृहातही अनेक वेळा आम्ही एकत्र बसायचो. 2014 पासून तर शेजारी बसण्याचे अनेक प्रसंग आले. खुले मन, ठामपणा आणि विरोध करण्याची क्षमता ही अजित दादांची ओळख होती.” त्यांनी सांगितले की, राजकारणात गोड बोलावे अशी सूचना देण्याचा प्रयत्न केला तरी अजित दादा नेहमी प्रामाणिक आणि रोखठोक बोलायचे.
जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या शरद पवारांवरील प्रेमाची आणि निष्ठेची आठवण करून दिली. “आर आर आबा नंतर मी म्हणायचो, आबा जेष्ठ आहेत, नंतर तुम्ही आणि मग मी असेल. दादानी महाराष्ट्राची आणि बारामतीची काळजी घेतली. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का अजित पवारच होता,” असे पाटील म्हणाले.
अजित पवारांना त्यांच्या मतदारांशी सरळ संवाद ठेवायला आवडायचे. एखाद्या कामाची गरज असली तर ते थेट फोन करून सांगत आणि जे करायचे असेल ते ठामपणे पूर्ण करत. जयंत पाटील यांनी सांगितले की, “अजित दादांचे स्वप्न होते की राजकारणात पुन्हा एकत्र काम करावे, संघटना मजबूत करावी. पण हे करत असतानाच नियतीने घात केला.”
शोकसभेत उपस्थितांचे भावनिक देखावे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या कार्यशैली, निष्ठा आणि मानवतेच्या आठवणींनी सर्वांना भारावून टाकले, तर त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाची आणि योगदानाची आठवण कायम राहणार आहे.






