पुणे : दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दिपके आणि त्यांची ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत आहे.सरकारी शाळांच्या दुरवस्थेनंतर आता त्यांनी आपला मोर्चा आदिवासी आश्रमशाळांकडे वळवला आहे.अभिजीत दिपके यांनी नुकतीच मराठवाडा आणि विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या संवादात विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. यात विद्यार्थिनींची बेकायदेशीरपणे गर्भधारणा चाचणी केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तसेच अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सरकारी आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी भंडाऱ्यातील एका सरकारी आश्रमशाळेचा वारंवार उल्लेख केला. तिथे एकाच खोलीत तब्बल 15 विद्यार्थ्यांना दाटीवाटीने राहावे लागते. या सर्व गंभीर समस्यांची दखल घेत, अभिजीत दिपके आता भंडाऱ्याला भेट देण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतून भारतात परतलेले अभिजीत दिपके आता विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे लढत आहेत. सुरुवातीला त्यांनी नीट पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले. या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांच्या दबावामुळे तत्कालीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा आदिवासी आश्रमशाळांकडे वळवला आहे.

या भेटीत मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी आदिवासी मुलांनाच गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
अलीकडेच, CJP मध्ये फूट पडल्याच्या चर्चा होत्या, परंतु दिपके यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही आणि ते केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणार आहेत.
सुरुवातीच्या आंदोलनात मिळालेल्या मोठ्या यशानंतर, अभिजीत दिपके आणि त्यांच्या पक्षाकडून देशभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या आक्रमकपणे मांडल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी केल्यानंतर आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते वाचा फोडणार आहेत.






