अमित मुंडीक

पुणे: मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्यावर मात करण्यासाठी पुण्यात गुरुवारी एक ऐतिहासिक आणि भव्य आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन, आधुनिक पकड तंत्रज्ञान आणि वन्यजीव संवर्धन या विषयांवरील हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तांत्रिक प्रशिक्षण मानले जात आहे. (human-wildlife conflict in Pune)
या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध लीगसी वाईल्डलाईफ फाउंडेशन (Legacy Wildlife Foundation) आणि वेटेक्स साउथ अफ्रिका (VetX South Africa) या संस्थांकडून तज्ज्ञांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीव पकड, व्यवस्थापन आणि वैज्ञानिक संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संस्थांनी पुणेकरांसाठी प्रथमच आपले अनुभव आणि तंत्रसंपदा उपलब्ध करून दिली आहे.
दोन नामांकित तज्ज्ञांची उपस्थिती
हाइन शोमन (वाईल्डलाईफ कॅप्त्चुर & ऑपरेशान स्पेशालिस्ट) Wildlife Capture & Operations Specialist, ज्यांनी जगभरात असंख्य रेस्क्यू ओपरेशन आणि मिशन्स पूर्ण केली आहेत. तसेच आधुनिक वन्यजीव उपचार तंत्र आणि ट्रॅंक्विलायझेशन पद्धतींमध्ये प्रावीण्य असलेले डॉ. जोसेफिन स्कारुप पीटरसन हेही उपस्थित होते.
दोन्ही तज्ज्ञांनी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. वन्यप्राण्यांची सुरक्षित पकड, त्यांना हानी न पोहोचवता नियंत्रणात ठेवण्याचे मार्ग, जैवविविधता व्यवस्थापन, तसेच वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या संघर्षांवर उपाय याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.







