दौंड, ता. 15 : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रीला आळा बसावा यासाठी दौंड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करून 2 हजार 300 रुपयांचा गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला. (Pune Latest Crime )

पहिल्या घटनेत कुरकुंभ येथील शेवाळे प्लॉटमध्ये आरोपी संगीता अर्जुन राठोड (वय 35) ही गावठी हातभट्टी दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडली. तिच्याकडून 5 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून किंमत 500 रुपये इतकी आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई ज्योती मोकळे यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत गोवा गल्ली परिसरात आरोपी अशोक नागु जाधव (वय 41) हा बेकायदेशीररीत्या 10 लिटर कॅनमध्ये 9 लिटर हातभट्टीची दारू बाळगून असल्याचे आढळले. त्याच्याकडून 900 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल पाटील घाडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खोरवडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराच्या आडोशाला आरोपी महानंदा कादी भोसले (वय 45) ही परवानगीशिवाय गावठी दारूची विक्री करताना पोलिसांच्या नजरेस पडली. तिच्याकडून 9 लिटर दारू (किंमत 900 रुपये) असा एकूण प्रोव्हिजन माल जप्त करण्यात आला. महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली वडवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दौंड पोलिसांनी तालुक्यात अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगत नागरिकांना संशयास्पद व्यवहारांची माहिती दिल्यास तातडीने गुन्हे उघडकीस आणता येतील, असे आवाहन केले आहे.







