कोल्हापूर: कोल्हापुरात पुण्यातील (Crime News) कोयता गँगप्रमाणेच नवी (Kolhapur News) टोळी तयार होतेय का, असा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यात घडली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केले. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी कृष्णा नामदेव खोत याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Breaking News)

ही घटना गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निसर्ग बार येथे घडली. लक्ष्मी इंडस्ट्रीज रोड, हातकणंगले येथील कृष्णा खोत, वय 33, याच्यावर विकी उर्फ रोहित घोरपडे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने वार केले. प्राथमिक तपासानुसार काही वर्षांपूर्वी कृष्णाने आपल्या पत्नीला सोडले होते आणि त्यानंतर तो विकी घोरपडे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवत होता. तिला फूस लावून पळवून नेल्याच्या चर्चांमुळे विकीच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता.
गुरुवारी संध्याकाळी प्रकाश आडके याने कृष्णाला फोन करून विकी आणि त्याची पत्नी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बोलावले. कृष्णा निसर्ग बार येथे पोहोचताच विकीने शिवीगाळ करून त्याच्यावर हल्ला चढवला. प्रथम दोन वार थेट डोक्यावर करण्यात आले. तिसरा वार हाताने अडवताना कृष्णाचा डावा हात गंभीर जखमी झाला. त्याचवेळी प्रकाश आडके आणि अमित यांनी विकीला चिथावल्याचे सांगण्यात आले आहे. तिघांनी मिळून कृष्णाला मारहाण केली आणि त्याला गंभीर अवस्थेत सोडून पसार झाले. आरोपी कोयता घटनास्थळीच फेकून गेले असल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी भीतीने ओरड सुरू केली.
जखमी कृष्णाला प्रथम हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याची प्रकृती नाजूक असल्याने सांगलीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून कोयता जप्त केला आहे. कृष्णाचा जबाब नोंदवून हातकणंगले पोलीस ठाण्यात विकी घोरपडे, प्रकाश आडके आणि इतर दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. संशयितांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू असून लवकरच आरोपी दबोचले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.







