खेड : राजगुरुनगर येथे सोमवारी पहाटे खाजगी शिकवणी वर्गात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वर्ग सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Pune Crime News)

ही घटना राजगुरुनगरमधील एका खासगी क्लासमध्ये घडली. शिक्षक अध्यापन करत असतानाच, क्लासमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याने अचानक आपल्या मित्राच्या गळ्यावर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थी 16 वर्षांचा असून तो दहावीचा विद्यार्थी होता. हल्ला करणारा विद्यार्थीही त्याच वयोगटातील असून दोघेही एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे खाजगी शिकवणी वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






