Baramati Murder Case: पुणे : पुण्यातील बारामती शहरात दारूच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादातून एका मित्राची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी 14 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे दोघे ही हल्लेखोर थेट पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. Baramati Murder Case

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे वय 20, रा. बारामती असे मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश लोंढे, समीर इक्बाल शेख वय 25, रा. देवळे इस्टेट बारामती आणि प्रथमेश राजेंद्र दळवी वय 20, रा. जगताप मळा बारामती हे तिघे मित्र रविवारी रात्री जुना बारामती मोरंगाव रस्त्यालगत एकत्र बसून दारू पित होते.
दारूच्या नशेत असताना तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला, मात्र काही वेळातच त्याच्यात मोठं भांडण सुरु झाले. या भांडणादरम्यान समीर शेख आणि प्रथमेश दळवी या दोघांनी अविनाश लोंढे याच्यावर दगडाने मारहाण केली. डोक्यावर आणि शरीरावर दगडाने हल्ला केल्यानंतर अविनाश गंभीर जखमी झाला.
या हल्ल्यात अविनाश बेशुद्ध अवस्थेत पडलेला असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर काही वेळाने भानावर आलेल्या दोन्ही आरोपींना आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन, आम्ही अविनाशची हत्या केली असल्याचे सांगत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या नेमकी कशामुळे झाली, वादाचे कारण काय होते, याचा सविस्तर तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे शहरातील जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथील वेताळबाबा मैदानात दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात शिविगाळ, बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढला. समीर व प्रथमेश या दोघांनी दगड घेत तो अविनाश याच्या डोक्यात घातला. तो मरेपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यानंतर हे दोघे पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार शेख यांनी काम पाहिले आहे. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






