Pune News : पुणे शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. गेल्या चार वर्षांत पुण्यात तब्बल 1 लाख 7 हजारांपेक्षा जास्त लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune News)

आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकारातून ही आकडेवारी मिळवली आहे. या माहितीनुसार, ससून रुग्णालय आणि पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कुत्रा चावल्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
- ससून रुग्णालयात
2022 मध्ये 4,852 रुग्ण
2023 मध्ये 9,377 रुग्ण
2024 मध्ये 11,625 रुग्ण
2025 एप्रिलपर्यंत 3,941 रुग्ण
असा एकूण जवळपास 30 हजार रुग्णांवर उपचार झाले आहेत. - तर पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये
2022 मध्ये 16,569
2023 मध्ये 22,945
2024 मध्ये 25,899
2025 मेपर्यंत 12,312
असे मिळून सुमारे 77 हजारांहून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत.
या दोन्ही आकडेवारी एकत्र केली तर चार वर्षांत 1,07,520 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचं समोर आलं आहे. ही संख्या पाहता परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येतं.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करणाऱ्या खाजगी संस्थांची माहितीच पालिकेकडे उपलब्ध नाही, असं उत्तर आरटीआयमध्ये देण्यात आलं आहे. म्हणजे कुत्र्यांचं लसीकरण, निर्बीजिकरण आणि त्यांची मोजदाद नेमकी कोण करत आहे, याचा ठोस तपशीलच पालिकेकडे नाही.
नियमांनुसार ही सगळी जबाबदारी महापालिकेची आहे. पण गेल्या काही वर्षांत या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.
रात्री रस्त्यांवर टोळक्याने फिरणारे कुत्रे, शाळकरी मुलांवर हल्ले, वृद्धांवर किंवा एकट्या महिलांवर धावणे, दुचाकी आणि सायकलस्वारांचा पाठलाग अशा घटना वारंवार घडत आहेत.
ही आकडेवारी समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. चार वर्षांत लाखभर लोकांना कुत्र्यांचा चावा आणि पालिकेला लसीकरण करणाऱ्या संस्थांचीच माहिती नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







