Ashok Kharat : नाशिकमधील ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता केवळ गुन्हेगारीपुरतं मर्यादित न राहता प्रशासकीय आणि आर्थिक स्तरावरही धक्कादायक वळण घेतलं आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, खरातच्या कुटुंबीयांच्या जमीन व्यवहारात एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढली आहे. (Ashok Kharat)

नाशिक तालुक्यातील पाथर्डी परिसरातील सुमारे 1 एकर (40 आर) जमिनीच्या सातबाऱ्यावर अशोक खरात आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीचं संयुक्त नाव नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. ही नोंद केवळ ओळख किंवा वैयक्तिक संबंधांपुरती नसून थेट आर्थिक भागीदारीकडे निर्देश करते. खरातच्या एकूण संपत्तीचा आकडा 200 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज असून, त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतांबाबतही तपास यंत्रणा अधिक सखोल चौकशी करत आहेत.
या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती. नियमांनुसार प्रतिनियुक्तीवर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एका पदावर राहता येत नाही. मात्र, संबंधित अधिकारी तब्बल 4 वर्षांपासून त्याच पदावर कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झालं का, हा प्रश्न उपस्थित होतो.
या घडामोडींमुळे विशेष तपास पथक आणि आयकर विभागाच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे. जमीन व्यवहारांची वैधता, पैशांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यावर पुढील चौकशी केंद्रित राहणार आहे.
एकूणच, खरात प्रकरण आता 1 व्यक्तीपुरतं राहिलेलं नाही, तर त्यातून उघड होत असलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय संबंधांमुळे ते राज्यातील एक मोठं आणि बहुआयामी प्रकरण बनत चाललं आहे.







