Amit Shaha On Vande Mataram: संसदेतील विशेष सत्रात वंदे मातरम हा मुद्दा आज दुसऱ्या दिवशीही केंद्रस्थानी राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi On Vande Mataram) यांनी सोमवारी लोकसभेत या चर्चेची सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंनी जोरदार वाद प्रतिवाद करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही या विषयावर आपले मत मांडले, तर गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी राज्यसभेतून विरोधकांवर थेट निशाणा साधला.

गृहमंत्री Amit Shaha काय म्हणाले?
राज्यसभेतील भाषणात अमित शहा म्हणाले की, “वंदे मातरम”वर चर्चा करण्याची गरज ते रचले गेले त्या काळातही होती, स्वातंत्र्यलढ्यातही होती, आजही आहे आणि 2047 मध्ये विकसित भारत घडल्यावरही ती कायम राहील.”
गृहमंत्र्यांनी ‘वंदे मातरम’ च्या पार्श्वभूमीचा उल्लेख करताना सांगितले की, इस्लामी आक्रमणांच्या शतकानुशतकांनंतर आणि ब्रिटिशांनी नवी संस्कृती लादण्याच्या प्रयत्नात भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होत असताना बंकिमचंद्रांनी हे गीत रचले. “भगवान श्रीराम, आचार्य शंकर आणि चाणक्य यांनी मातृभूमीची पूजा केली. मातृभूमीपेक्षा मोठे काही नाही; हीच भावना बंकिम बाबूंनी पुन्हा प्रज्वलित केली,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका
यावेळी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत शहा म्हणाले की, ‘वंदे मातरम’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमावेळी नेहरू यांनी गीताचे दोन भाग करून ते दोनच श्लोकांपर्यंत मर्यादित केले आणि “याच क्षणापासून तुष्टीकरणाला सुरुवात झाली. हे झाले नसते, तर देशाचे विभाजन टळले असते,” असा दावा त्यांनी केला.
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अनेकांना तुरुंगात डांबण्यात
शहा पुढे म्हणाले की, वंदे मातरम च्या शताब्दी वर्षानिमित्त इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ते घोषवाक्य उच्चारल्याबद्दल अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. आणीबाणीच्या काळातील प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, विरोधी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची झालेली अटक, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
काँग्रेसवर टीका करताना शहा म्हणाले की, पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने एकवेळ संसदेत वंदे मातरम गायन बंद केले होते. “1992 मध्ये भाजप खासदार राम नाईक यांनी गीत पुन्हा सादर करण्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभा अध्यक्षांना सभागृहात ते गायले पाहिजे, अशी मागणी केली,” असे त्यांनी सांगितले.







