पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.आज 1 सप्टेंबरपासून आरटीओ प्रशासनाने रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, हे नवे दर संपूर्ण पुणे जिल्ह्यात तात्काळ लागू झाले आहेत. महागाईच्या या काळात भाडेवाढ झाल्यामुळे रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

नवीन भाडेदर खालीलप्रमाणे आहेत:

किमान भाडे (पहिले 1.5 किमी): आता 25 ऐवजी 30 रुपये द्यावे लागतील. (थेट 5 रुपयांची वाढ)

पुढील प्रवास (प्रति किमी): आधीच्या 17 रुपयांऐवजी आता 20 रुपये आकारले जातील.
इंधनाचे वाढलेले भाव, रिक्षा दुरुस्तीचा खर्च आणि विम्याच्या रकमेत झालेली वाढ यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ही सुधारित भाडेवाढ मंजूर केली आहे. या निर्णयामुळे नोकरदार वर्ग, महिला आणि विद्यार्थ्यांचे मासिक आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
भाडेवाढ लागू झाल्यामुळे सर्व रिक्षाचालकांना आपल्या वाहनांचे डिजिटल मीटर त्वरित ‘कॅलिब्रेट’ (अपडेट) करून घ्यावे लागतील. मीटर अपडेट होईपर्यंत प्रवाशांशी वाद टाळण्यासाठी चालकांनी आरटीओचे अधिकृत भाडेपत्रक प्रवाशांना दाखवणे आवश्यक आहे. जुन्या मीटरमुळे होणारे वाद आणि चालकांची संभाव्य मनमानी रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाला कडक पावले उचालावी लागतील.






