गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावात आज पहाटे (7 ऑगस्ट 2025) एक हृदयद्रावक अपघात घडला. आर्मोरी-गडचिरोली महामार्गावर पहाटे 5 ते 6:30 च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 6 मुलांवर भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात चार अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.

काटली गावात, गडचिरोलीपासून 12 किमी अंतरावर, 12 ते 16 वयोगटातील सहा मुलं पहाटे व्यायामासाठी काटली नाल्याजवळ गेली होती. ही मुलं रस्त्याच्या कडेला बसली होत अचानक एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, ट्रकचा चालक वेगात होता आणि अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
अपघातातटिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), दुषण दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) सर्व राहणार काटली यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेले क्षितिज तुलनिदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपटे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नागपूरला पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
या घटनेने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, काटली, साखरा आणि पोरला गावातील लोकांनी रस्ता अडवून निदर्शनं केली आहेत. या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली. व ट्रकचालकाचा शोध सुरू आहे, परंतु अद्याप पोलिसांना यात यश आलेले नाही.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 7, 2025
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी X वर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि म्हणाले, “आर्मोरी-गडचिरोली महामार्गावरील हा अपघात अत्यंत दुखद आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाईल आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल.” जखमींना नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न बघत होती आणि त्यासाठी नियमित व्यायाम करत होती. या अपघातामुळे त्यांच्या कुटूंबियांच्या स्वप्नांचा चुराड झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र दुःख पसरलं आहे.
गडचिरोलीत यापूर्वीही ट्रक अपघातांच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांनी रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.







