पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून या आर्थिक मदतीचे वाटप सुरू होण्याचा अंदाज आहे. नागपूर येथील अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा ‘एल निनो’च्या परिणामामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिली. पाण्याअभावी पिके जळून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने दिवाळीपूर्वीच दुष्काळी भागांचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. सध्या राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने लवकरच आणखी 10 तालुक्यांचा यात समावेश केला जाऊ शकतो. तसेच, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्राकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
आकडेवारीचा विचार करता, महाराष्ट्रात एकूण 1 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यातील 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांकडे स्वतःचा ओळख क्रमांक आहे. दुष्काळी तालुक्यांतील 1 कोटी 10 लाख बाधित शेतकऱ्यांपैकी 1 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीआधीच 5 हजार रुपयांची आगाऊ मदत मिळाली आहे. आता याच 1 कोटी पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये दिले जाणार आहेत.

दरम्यान, उर्वरित 10 लाख शेतकऱ्यांना अद्याप पहिला हप्ता मिळालेला नाही. शेतकरी ओळख क्रमांक नसणे, जमीन सामाईक असणे किंवा वारसदारांची नावे सातबाऱ्यावर न चढणे या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पैसे अडकले आहेत. या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताच त्यांच्या खात्यातही मदतीची रक्कम थेट जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






