पुणे : चोरीचे मोबाईल खरेदी केले म्हणून मोबाईल चोरीच्या गुन्हयात आरोपी न करणे व अटक न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारसह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.२२) अटक केली आहे.
दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय ३४, पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर) आणि सिमोन अविनाश साळवी (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाचे मोबाईल खरेदी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांनी चोरीचे मोबाईल खरेदी केले म्हणून मोबाईल चोरीच्या गुन्हयात आरोपी न करणे व अटक न करण्यासाठी आरोपी पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व त्यापैकी ४० हजार रुपये लगेचच देण्यास सांगीतले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या खातीरजमा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.२२) सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्या भावाकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी सिमोन साळवी रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दीपक क्षीरसागर यालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.