Fraud | पुणे : मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ८ लाख ३८ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी उत्तम चेनाराम सुथार (२८, रा. ३०४, रिचमंड टेरेस, भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुथार हे सोशल मीडियावर एका मोबाइल कंपनीची डीलरशिप शोधत होते. त्यावेळी त्यांना एका वेबसाईटची माहिती मिळाली. त्यावर क्लिक करून नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल टाकला असता २-३ दिवसांनी संबंधित मोबाइल कंपनीच्या डीलरशिपसाठी तुम्ही मेल केला होता का? असा त्यांना फोन आला.
मी तुम्हाला मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो. तुमचा अर्ज मी पुढे पाठवला असून, अर्ज स्वीकारण्यात आल्याचे त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले. त्यानंतर २-३ दिवसांनी पुन्हा तुमची मोबाइल कंपनीची डीलरशिप कन्फर्म झाली आहे, त्यासाठी मला पेमेंट करावे लागेल, असे सांगत तरुणाकडून १५ हजार २०० रुपयांची मागणी करण्यात आली.
तसेच प्रोसेसिंग फीस, दळणवळण खर्च, दुकानाचा फर्निचर खर्च व मोबाइलचे प्रोडक्ट असे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. कंटेनर व्होवरलोडिंगमुळे आरटीओने पकडला आहे, म्हणून आणखी ३५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
सुथार यांनी २० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात संबंधित फोनवरील व्यक्तीला ८ लाख ३८ हजार २०० रुपये दिले. मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद येत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, उत्तम सुथार यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेत संजय श्रीवास्तव असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे करत आहेत. याप्रकरणी कोथरूड सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.





