जळगाव : WhatsAppवरील एक छोटीशी चूक जळगावच्या व्यापाऱ्याला तब्बल पावणे पाच लाख रुपयांचा फटका (Cyber Crime)देऊन गेली. मोबाईलवरील ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंगमुळे एका अनोळखी फाईलने व्यापाऱ्याचं संपूर्ण बँक खाते हॅक केलं आणि काही क्षणांतच ₹४.६४ लाख गायब झाले!

जळगावचे व्यापारी निलेश हेमराज सराफ यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या WhatsAppवर एका अनोळखी नंबरवरून Customer Service Support नावाची APK फाईल आली. मोबाईल वाय-फायला जोडलेला असल्याने ऑटो डाऊनलोड सुरू होतं आणि ती फाईल आपोआप मोबाईलमध्ये उतरली. काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातून पावणे पाच लाख रुपये उडाल्याचा मेसेज आला आणि व्यापाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली!
सायबर गुन्हेगारांनी या फाईलद्वारे सराफ यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक केला. OTP, बँकिंग डेटा, पासवर्ड सगळं त्यांच्या हाती लागलं. सराफ यांनी वेळेवर बँकेत धाव घेत खातं होल्ड केल्याने उरलेले पैसे मात्र वाचले.
या प्रकारानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे “WhatsAppवरील Auto Download Setting बंद ठेवा. अनोळखी नंबरवरून आलेल्या फाईल्स, लिंक किंवा फोटो डाऊनलोड करू नका. याच मार्गाने सायबर गुन्हेगार तुमचा मोबाईल आणि खाते हॅक करतात.”
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ऑटो डाऊनलोड हा पर्याय सोयीचा असला तरी तो सायबर फसवणुकीचं दार उघडतो. त्यामुळे WhatsApp वापरताना सावध राहा — कारण एका क्लिकमुळे तुमचे लाखो रुपये क्षणात गायब होऊ शकतात!







