Crime : पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे अनैतिक संबंधातून रचलेल्या विषारी कटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समाधान गणपत लोहार (34) यांचा 16 जानेवारी 2026 रोजी विषबाधेमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सारिका लोहार आणि तिचा कथित प्रियकर शेखर संताराम चंदनशिवे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाणे करत आहे.

समाधान आणि सारिका यांचा विवाह 2013 मध्ये झाला होता. पोलिसांकडे नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या 4 वर्षांपासून सारिकाचे शेखरशी संबंध होते. या संबंधाची माहिती समाधान आणि त्यांची आई विमल यांना होती. यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.
10 जानेवारी 2026 रोजी सकाळी शेखरने सारिकाला गावाबाहेरील शेतात बोलावून कथितपणे विषारी औषधाची बाटली दिली. रात्री सुमारे 8 वाजता सारिकाने घरातील पाण्याच्या कळशीत ते औषध मिसळल्याचा आरोप आहे. उद्देश सासू विमल यांना संपवण्याचा होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. विमल यांनी पाणी तांब्यात घेतले; मात्र चव कडू वाटल्याने त्यांनी ते न पिता बाजूला ठेवले.
जेवणानंतर अनभिज्ञ असलेल्या समाधान यांनी तेच पाणी पिल्याने काही तासांत त्यांना तीव्र उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान 16 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना महिन्यानंतर उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या तणावाचे हे टोकाचे रूप असल्याची चर्चा आहे. पोलिस विषारी पदार्थाचा अहवाल, कॉल डिटेल्स आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.







