Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री एक थरारक घटना घडली असून बजरंग चौक परिसरात चक्क अपहरणाचा प्रकार समोर आला आहे. स्पोर्ट्स बाईकच्या खरेदी-विक्रीवरून सुरू झालेला वाद थेट अपहरणापर्यंत पोहोचला.

मिळालेल्या माहितीनुसार, १२वीत शिकणाऱ्या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा काही जणांशी बाईकच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री तो बजरंग चौक परिसरात असताना अचानक दोन कारमधून आलेल्या ७ जणांच्या टोळीने त्याला अडवलं. काही कळायच्या आतच त्या मुलाला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हा सगळा प्रकार अगदी फिल्मी स्टाईलने झाला असून तो जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओही आता समोर आला आहे. (Crime News)
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस लगेचच अॅक्शन मोडमध्ये आले. कंट्रोल रूमला कळवून शहरभर नाकाबंदी करण्यात आली. अपहरणकर्त्यांच्या कारचा माग घेत पोलिसांनी थेट वाळूज परिसरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.
या कारवाईत विवेक गणेश सोनवणे, पांडुरंग माधवराव सोनवणे आणि रोहन सुनील ढवळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी चार आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.







