Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अध्यात्म, संस्कार आणि वारकरी परंपरेचे धडे देणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षानेच एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 5 वर्षे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याच्यावर हा आरोप आहे. पीडित मुलगी इयत्ता 8 वीमध्ये शिकत असताना, म्हणजे सुमारे 2021 पासून आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरू केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी पीडितेच्या शेजारी राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलगी घरी एकटी असताना किंवा स्वतःच्या घरी कोणी नसताना तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. “मी आधीही 2 हाफ मर्डर केले आहेत, कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला संपवेन,” अशी भीती तो दाखवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीपोटी पीडित मुलगी अनेक वर्षे हा छळ सहन करत होती.
या प्रकरणाचा थरार 10 मार्च 2026 रोजी समोर आला. आरोपीने पीडितेला फोन करून घरी बोलावले. तिने जाण्यास नकार दिल्यानंतर कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला एका खोलीत नेऊन मारहाण केली आणि स्वयंपाकघरातील लोखंडी पक्कड गरम करून तिच्या अंगावर चटके दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जाते.
14 मार्च रोजी पीडितेचा भाऊ घरी आल्यानंतर तिची अवस्था पाहून त्याने विचारपूस केली. त्यानंतर मुलीने मागील 5 वर्षांपासून सुरू असलेला छळ सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी पारनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला 15 मार्च रोजी पहाटे 4 वाजता अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि धार्मिक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.







