भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर खडकी (ता. दौंड) गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स चालकाने अचानक लेन बदलून कारला धडक दिल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून, ट्रॅव्हल्स चालकाविरोधात रावणगाव पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बाबासाहेब श्रीरंग गायके (वय 36, रा. तेर, ता. जि. धाराशीव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. निजामुद्दीन इकबाल खान (वय 24, रा. नवी मुंबई) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन खान हे 18 सप्टेंबर रोजी रात्री सोलापूरहून मुंबईच्या दिशेने आपल्या किया सेल्टॉस कारने निघाले होते. खडकी गावच्या हद्दीतील हॉटेल शिवशंकरजवळ ते आले असता त्यांच्या कारच्या पुढे ट्रॅव्हल्स बस जात होती.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ट्रॅव्हल्स चालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक लेन बदलली. त्यामुळे ट्रॅव्हल्सने कारच्या डाव्या बाजूला धडक दिली. धडकेनंतर कार डिव्हायडरवर चढली. चालकाने कार पुन्हा रस्त्यावर घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सने कारला मागील बाजूनेही धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने वाहन हॉटेल शिवशंकरजवळील सर्व्हिस रोडवर घेतले. त्यावेळी त्याचे नाव बाबासाहेब श्रीरंग गायके (वय 36, रा. तेर, ता. जि. धाराशीव) असल्याचे समोर आले.

ट्रॅव्हल्स चालकाने रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगात वाहन चालवून कारला दोनदा धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी रावणगाव पोलिसांनी बाबासाहेब गायके यांच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस नाईक बाळासाहेब पानसरे करीत आहेत.






