Ashok Kharat : नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक सल्लागार म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता गुंतागुंतीचं आणि धक्कादायक वळण घेतलं आहे. महिला अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आरोपांमुळे तो सध्या पोलिस कोठडीत असून, तपासात रोज नवी माहिती समोर येत आहे.

तपासातील महत्त्वाचा धागा म्हणजे त्याचा निकटवर्तीय ऑफिस बॉय नीरज जाधव. प्राथमिक चौकशीत या संपूर्ण प्रकरणामागे नीरजच ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरातच्या कार्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकारांची माहिती मिळाल्यानंतर नीरजने त्याचा फायदा घेत ब्लॅकमेलिंगचा डाव आखल्याचं समोर येतं. डिसेंबर 2025 मध्ये त्याने कार्यालयातील तब्बल 58 कथित आक्षेपार्ह सीसीटीव्ही क्लिप्स आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्याच्या बदल्यात सुमारे 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे.
खरातने या दबावाला न जुमानल्यावर नीरजने कथित पीडित महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेला मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावल्याचं समोर आलं. मात्र, ही महिला घाबरली नाही; उलट तिने ही बाब खरातला सांगितली. खरातने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला, आणि याच टप्प्यावर प्रकरण उघड होण्यास सुरुवात झाली.
यानंतर नीरजने नाशिकमधील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाने पुढाकार घेत पोलिसांत तक्रार केली आणि संपूर्ण प्रकरण प्रकाशात आलं. या तक्रारीनंतर खरातविरोधातील गंभीर आरोप उघडकीस आले.
दरम्यान, पोलिसांनी छाप्यातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ, एक पिस्तूल आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केल्याचा दावा आहे. एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर खरातला अटक करण्यात आली.
या प्रकरणाने केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय स्तरावरही प्रश्न निर्माण केले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तथाकथित ‘आध्यात्मिक’ प्रतिमेच्या आड चालणारे गैरप्रकार आणि त्यातून निर्माण होणारा सत्तासंबंधांचा प्रभाव या सगळ्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे.







