बारामती, ता. 07 : शेजारी राहणाऱ्या नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून 10 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. (Baramati News)

हसन शमशुद्दीन झारे ऊर्फ राजू (वय-52, रा. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याने 10 वर्षांची सक्तमजुरी भोगली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्याने पुन्हा अशाच प्रकारचा घृणास्पद गुन्हा केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या शेजारीच राहत होता. त्याने परिचयाचा फायदा घेत बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेले. तिथे तिच्याशी अश्लील कृत्य करून हे कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तपासादरम्यान आरोपीने आणखी एका मुलीसोबतही अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे.
हसन झारे हा सराईत विकृत गुन्हेगार आहे. त्याने 2009 मध्ये एका 13 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या मनोवृत्तीत कोणताही बदल झाला नसल्याचे या नव्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, रविवारी (ता. 05) या घटनेची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला येताच आरोपीला याची कुणकुण लागली आणि तो घरातून पसार झाला. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली केल्या. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण शहरात शोधमोहीम राबवली. अखेर, शहर सोडून पळून जाण्याच्या बेतात असताना बारामती एस.टी. स्टँड परिसरात पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस हवालदार सुलतान डांगे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव, राहुल बडे आणि गौरव ठोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृहात (जेल कस्टडी) करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







