महाराष्ट्र : भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Maharashtra New Governor Acharya Devvrat) यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यासाठी नियुक्त केले आहे. आचार्य देवव्रत हे त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. ही नियुक्ती तात्काळ लागू होईल.

67 वर्षीय राधाकृष्णन हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार होते. मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला.
राष्ट्रपती कार्यालयाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून सी.पी. राधाकृष्णन यांनी राजीनामा दिल्यामुळे, भारताच्या राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे, जी ते त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबत पार पाडतील.’
आचार्य देवव्रत कोण आहेत?
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारण्यांपैकी एक आहेत. ते 2019 पासून गुजरातचे 20 वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते 2015 ते 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.







