सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द (Sangali News) येथील सरपंच शीतल पाटील यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाईचा वेग वाढला असून त्यांच्या (Sangali Bribe News) अपात्रतेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. ६) शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर सायंकाळी कारवाई करत सरपंच शीतल पाटील आणि त्यांचे पती बाळासाहेब पाटील यांना रंगेहाथ पकडले होते. ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांनाही अटक करण्यात आली. या घटनेनंतर शिराळा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करत सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्या लोकनियुक्त सरपंच असल्याने त्यांच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांच्या स्तरावर होणार आहे. त्यासाठी आवश्यक अहवाल जिल्हा परिषदेकडून तयार करून पाठवला जाणार आहे.
प्रक्रियेनुसार, संबंधितांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असून, सुनावणीदरम्यान त्यांचे स्पष्टीकरण ऐकले जाईल. त्यानंतर सर्व बाबींचा एकत्रित अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतरच अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेले बाळासाहेब पाटील हे शिक्षक असल्याने त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया देखील प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे परिणाम केवळ राजकीयच नव्हे तर शासकीय सेवेतही दिसून येत आहेत.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे आणि लवकरच अपात्रतेसंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.







