पंढरपूर: शक्तीपीठ महामार्गाबाबत अखेर (Shaktipeeth Expressway) मोठा निर्णय जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर वादग्रस्त भाग वगळून (Pandharpur News) नव्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासून हा प्रकल्प सतत चर्चेत होता. सुपीक जमीन, पाणीसमृद्ध परिसर आणि भीमा नदीचा पट्टा बाधित होणार असल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या मार्गात बदल जाहीर केला आणि वादग्रस्त भाग टाळण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यापूर्वी हा महामार्ग पंढरपूर तालुक्यातील कासोगाव, अनवली, खर्डी, तापकीर शेटफळ, आंबे, रांजणी, विटे, पोहोरगाव या भागांतून जाणार होता. या संपूर्ण परिसरातून भीमा नदी वाहत असून पाणी मुबलक असल्याने येथे बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या मार्गामुळे शेती आणि पाणीस्रोतांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. प्राथमिक रेखांकन आणि सर्वेक्षणानंतर जमिनीच्या मोबदल्याचे निकष समोर आल्यानंतर, बागायती जमीन कमी दरात संपादित होणार असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाला मार्गात बदल करणे अपरिहार्य ठरले. नव्या रेखांकनानुसार शक्तीपीठ महामार्ग आता पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणार आहे. बार्शी, वैराग, करकंब, भोसे, पटवर्धन कुरोली मार्गे हा महामार्ग सांगोल्याला जोडला जाणार असल्याची माहिती आहे. नव्या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले असले तरी प्रशासनाकडून याबाबत सध्या गोपनीयता पाळली जात आहे. या बदलामुळे पंढरपूर तालुक्यातील नव्या भागात विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागपूर ते गोवा जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे समर्थन समिती ने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हे वगळून महामार्गाच्या आखणीत बदल केल्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकरी असमाधानी असल्याचा दावा समितीकडून करण्यात आला आहे.






