कोल्हापूर: कोल्हापूर येथे घडलेली एक अत्यंत भीषण घटना हुपरी भागातून समोर आली आहे. सूर्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका 45 वर्षांच्या मुलाने आपल्याच वृद्ध आई-वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास घडला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुनील नारायण भोसले असे या आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या 75 वर्षीय वडिलांची आणि 65 वर्षीय आईची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण गणपतराव भोसले आणि आई विजयमाला नारायण भोसले असे असे आई- वडिलांची नावे आहेत. या नराधम मुलाने आई-वडिलांवर हल्ला करण्यासाठी विळी, लाकडी दांडके आणि काचेच्या तुकड्यांचा वापर केला. त्याने प्रथम आपल्या आईच्या हाताच्या नसा कापल्या आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. जेव्हा वडिलांनी आईबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने त्यांना मागच्या खोलीत नेले आणि त्यांच्या डोक्यात काठीने जोरात प्रहार केला. त्यानंतर वडिलांच्याही हाताच्या शिरा कापून त्याने त्यांचा जीव घेतला. आई-वडिलांचा वृद्धापकाळाचा आधार होण्याऐवजी मुलानेच हत्या केल्याचे पाहून परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
हत्या केल्यानंतर आरोपी सुनील स्वतःहून पोलीस ठाण्यात चालत गेला. तिथे त्याने पोलिसांना आपल्या कृत्याची माहिती दिली, कौटुंबिक कलहामुळे हा प्रकार घडला असावा, असे सध्या तरी पोलिसांचे म्हणणे आहे. हुपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





