Nashik : ‘प्रेयसीला तिची आई मारहाण करते’ या एकाच रागातून एका माथेफिरू प्रियकराने मध्यरात्री नाशिकमध्ये मोठा राडा केला. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने प्रेयसीच्या घरच्यांना चक्क कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. अंबडमधील सावतानगर भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी घबराट पसरली होती.

नेमकं प्रकरण काय?
अंबडमधील एका तरुणीचे कुणाल वानखेडे नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. ‘तुझी आई तुला नेहमी मारहाण करते,’ असा समज कुणालचा होता. याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी कुणाल आपल्या एका मित्राला सोबत घेऊन रात्री २ वाजता थेट प्रेयसीच्या घरापाशी पोहोचला. त्याने जोरात दरवाजा वाजवून आरडाओरडा करायला सुरुवात केली.
हातात कोयता अन् मुलाचा घेतला चावा
घरच्यांनी बाहेर येऊन विचारणा केली असता, कुणालने अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर त्याने संतापून तरुणीच्या भावाच्या हाताचा जोरात चावा घेतला. इतक्यावरच न थांबता, त्याने कमरेचा कोयता बाहेर काढला आणि घरच्यांवर उगारला. “ती फक्त माझी आहे, तिला यापुढे हात लावला तर सगळ्यांना संपवून टाकीन,” अशी धमकी त्याने भररस्त्यात ओरडून दिली.
पोलिसात गुन्हा दाखल
या भयंकर प्रकारानंतर पीडित कुटुंबाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. अंबड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संशयित कुणाल वानखेडे आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री घडलेल्या या ‘कोयता स्टाईल’ सिनेमॅटिक ड्रामामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





