सांगली: सांगली जिल्ह्यातील (Crime News) तासगाव तालुक्यात घडलेली एक हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका मुलाने जन्मदात्या आईची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याने तासगाव परिसर हादरला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या 70 वर्षांच्या शांताबाई चरण पवार या बुधवारी रात्री घरी होत्या. त्यांचा मुलगा, जगन चरण पवार (वय 44), रात्री सुमारे 10.30 वाजता दारूच्या (Alcohol) नशेत घरी परतला. किरकोळ कारणावरून आई-मुलामध्ये वाद झाला आणि जगनने रागात आईची हत्या केली.

संतापाच्या भरात त्याने घरातील तलवार उचलली आणि आईवर वार केले. तलवारीच्या गंभीर घावामुळे शांताबाईंचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला असून, आरोपी मुलगा जगन पवार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास (Investigation) सुरू आहे.
पोटच्या मुलानेच आईचा अशा क्रूर पद्धतीने खून केल्यामुळे तासगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.







