सोलापूर: राज्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यात सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींचा थकीत कर एकरकमी भरल्यास नागरिकांना थेट 50 टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

या अभियानाच्या अनुषंगाने रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे झालेल्या कार्यशाळेत मंत्री गोरे बोलत होते. या वेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कर थकविणाऱ्यांना निवडणुक लढवण्यास निर्बंध
कार्यशाळेत बोलताना पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीचा कर वेळेवर न भरता केवळ निवडणुकीच्या तोंडावरच भरणाऱ्यांवर शासनाचे आता लक्ष आहे. सलग पाच वर्ष कर न भरणाऱ्यांवर निवडणूक लढविण्यावर निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, अभियान कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन गावाच्या विकासासाठी केंद्रित असले पाहिजे. गावाला एकत्र आणून, विकासाच्या मुद्यांवर काम करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.
अभियानामध्ये बक्षीस योजना देखील राबविण्यात येणार असून, कार्यक्षम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. त्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गोरे यांनी यावेळी केले.







