यवतमाळ: राज्याचे (Dr Mirza Rafi Ahmed Baig) सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. मूत्रपिंडाच्या विकाराने ते दीर्घ काळापासून त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 11 व्या वर्षी त्यांनी कविता लेखनाची सुरुवात केली होती. 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली आणि 20 काव्यसंग्रह त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत.

सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, आणि दोन कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे.
महाराष्ट्रभर त्यांची ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली काव्यमैफल लोकप्रिय होती. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. बेग, अमरावतीतील वलगाव रोडवरील त्यांच्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या निवासस्थानी राहत होते. आज दुपारी दोन वाजल्यानंतर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.






