गडचिरोली: विवाहित महिलेवर अत्याचार (Crime News) करताना तिच्या कुशीत (Gadchiroli News) झोपलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण (Mulchera News) हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांनी बुधवारी हा महत्त्वाचा निकाल दिला. तब्बल 7 वर्षांनंतर या अमानुष गुन्ह्याचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबाला काहीसा न्याय मिळाला आहे. (Latest Marathi News)

रोजगारासाठी पती परराज्यात
ही धक्कादायक घटना जून 2017 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर गावात घडली होती. पीडित महिला आपल्या पती आणि 3 वर्षांच्या मुलासोबत राहत होती. रोजगारासाठी पती आंध्र प्रदेशात गेल्यानंतर घरात आई आणि चिमुकला मुलगा असे दोघेच होते. याच दरम्यान शेजारी राहणारा संजू विश्वनाथ सरकार याने मध्यरात्री घरात घुसखोरी केली. त्यानंतर विवाहित महिलेवर अत्याचार करताना तिच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण हत्या केली.
संपूर्ण गावात संताप
या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली होती. संतप्त गावकऱ्यांनी आरोपी संजू सरकारचे घर जाळले होते. जीवाच्या भीतीने आरोपीच्या कुटुंबीयांनी गाव सोडून आष्टी येथे स्थलांतर केले होते. आरोपी गुन्हा करताना 22 वर्षांचा होता आणि अविवाहित होता. तो सुमारे 8 वर्षे तुरुंगात होता. सुमारे 8 महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर तो आष्टी येथे एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने विवाहही केला होता.
पुरावे ठरले महत्वाचे
या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 376, 307 आणि 450 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष वामे यांनी तपास करून पुढील तपास उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी केला. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले.
नराधमाला फाशी?
सर्व पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संजू विश्वनाथ सरकार (रा. कांचनपूर, ता. मुलचेरा) याला भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच पीडित महिलेला विधिसेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.







