Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गॅन्ट्री उभारणीच्या कामामुळे समृद्धी महामार्गावरील काही भागात 8 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम एकूण 15 टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात काही काळासाठी वाहतूक थांबवावी लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Samruddhi Mahamarg)

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. या कामामुळे महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन आणि नियंत्रण अधिक प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कामासाठी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या 296 किमी ते 502.752 किमी या दरम्यान गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा या तालुक्यांमधून तसेच जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर या तालुक्यांमधील मार्गावर हे काम होणार आहे.
गॅन्ट्री बसविण्याच्या कामादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक सुमारे 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबवली जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






