Suicide News : जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव अशी मृत पती-पत्नीची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य शिवापूर शिवारात वास्तव्यास होते. राहत्या घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या शेतात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दोघांनाही खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
जाधव दाम्पत्याच्या या आत्महत्येमुळे त्यांच्या दोन मुलांचे छत्र हरपले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, दोघेही शिक्षणासाठी गावाबाहेर राहत असल्याने घटनेच्या वेळी घरी नव्हते. आई-वडिलांच्या या धक्कादायक निर्णयामुळे मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक विवंचना की कौटुंबिक कारण, या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शिवापूर गावावर शोककळा पसरली आहे.






